नाशिक Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute:ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. यावर छगन भुजबळ म्हणाले की, मी अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो, मात्र आमच्यात कोणताही वाद झालेला नाही. दोन भावांमध्ये जशी चर्चा होते, तशी ती चर्चा आमच्यात झाली. मात्र, काहींनी पराचा कावळा केला, असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
त्यामुळं मी उस्फूर्तपणे बोललो :ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळ म्हणाले की, मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेताना आरक्षणाचा अनुशेष बाकी आहे. याकडं मी लक्ष वेधलं. न्याय मिळत नसेल तर बोलावं लागतं. नोकरीत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असताना अजित पवारांनी सचिवांना याबाबत विचारलं. त्यावर सचिवानं अशी काही माहिती नसल्याचं सांगितलं. त्यामुळं मी उस्फूर्तपणे बोललो. तुमच्याकडे माहिती नाही असं, होऊ शकत नाही. माझा मुद्दा मी थोड्या मोठ्या आवाजात मांडला, मात्र याचा पराचा कावळा करण्यात आला.
मराठवाड्यात ओबीसीच्या नोंदी पैसे घेऊन : काही ठिकाणी चुकीच्या नोंदी करून नगरसेवक निवडून आले आहेत. याबाबत त्यांच्या विरोधात कोर्टात केसेस आहेत. प्रत्येकाच्या विरोधात कोर्टात जाणं शक्य नाही. शासनानं याकडं लक्ष दिलं पाहिजे. चुकीचं प्रमाणपत्र कोणालाही देता कामा नये.