नाशिक (येवला) - लासलगाव येथील शिवसाई एक्स्पोर्टकडून नेमलेल्या कंत्राटदाराने शेतकऱ्यांचे पैसे वेळेत दिलेले नाहीत. दरम्यान, याबाबत कंपनीकडे तक्रार प्राप्त झाली असून, आठ दिवसांत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे पेमेंट कंपनीने करण्याच्या सूचना कंपनीचे मालक व व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संयम राखावा, त्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळतील, असे आवाहन नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
शिवसाई एक्सपोर्टच्या कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक, छगन भुजबळांनी प्रकरणाची घेतली दखल भुजबळांनी घेतली आढावा बैठक घेतली
शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी व लासलगाव पोलीस स्टेशन येथे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कंपनीचे मालक, व्यवस्थापक, आणि शेतकऱ्यांना येवला येथे बोलवून बैठक घेतली. या बैठकीत संबंधित तक्रारीबाबत आढावा घेतला. यावेळी शिवसाई एक्स्पोर्ट कंपनीचे मालक संभा शिवाराव, कंपनीचे सीईओ नरेश चौधरी, सीए शिवदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
'गुन्हा दाखल करण्यात येणार'
शिवसाई एक्स्पोर्ट कंपनीने शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला वेळेत पेमेंट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, कंपनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे आठ दिवसांच्या आत देईल असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, आजवर गेल्या चार वर्षात कंपनीने २४० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला असून, कंत्राटदाराने शेतकऱ्यांची १३ लाख रुपयांची फसवणूक केली असून, यातून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
'शेतकऱ्यांनी संयम बाळगावा'
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन, कंपनीने नेमलेल्या कंत्राटदरकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या कंत्राटदारावर कंपनीकडून कारवाई करण्यात येणार असून, त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे पैशे घेण्यात येणार आहेत. दरम्यान, शिवसाई एक्स्पोर्टकडून शेतकऱ्यांचा २० तारखेपर्यंत मोबदला देण्याबाबत सूचना केल्या असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. तरी, सर्व शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.