नाशिक- गेल्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ बोलत यांनी इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असून शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत मिळावी, यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत मिळवुन देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने पंचनामा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, जेणेकरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकरच मदत जाहीर केली जाईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
तसेच, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यास राज्य शासनप्रयत्नशील आहे. संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची शासनामार्फत पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीअंतर्गत कोणत्या पिकांचे व किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा काढला असेल त्यांनी तातडीने सबंधीत विमा कंपनीकडे रीतसर अर्ज दाखल करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्यासह संपूर्ण देश आर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून साधारण 20 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली, असेही ते म्हणाले.