नाशिक- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा होत असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख यांच्या पुढाकाराने दिंडोरीरांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
दिंडोरीच्या नागरिकांच्या वतीने रक्तदान रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले आहे. रक्तदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले आणि सॅनेटायझरचा वापरही करण्यात आला.
देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन समता ब्लड बँकेचे प्रमुख शाम बडगुजर यांच्या टीमने नियोजन करून रक्ताचे संकलन केले. दिंडोरी नगरपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, दिंडोरीचे नगरसेवक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि महिलांनी सहभाग घेतला होता.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, अविनाश जाधव, मयूर घोरपडे, नितीन देशमुख, अतुल वाघ, किरण दळवी, निलेश पाडेकर, रवींद्र देशमुख आणि नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.