नाशिक -जन्माला आल्यापासून जीवनात अंधकार असला तरी अंध व्यक्तींमधली कला लपत नाही. आज हेच नाशिकच्या अंध शाळेतील विद्यार्थिनींनी सिद्ध केले आहे. सातपूरच्या नैब स्कूलमध्ये आयोजित शाडू मातीपासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत अंध विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या मनातील बाप्पा साकारला.
अंध विद्यार्थिनींनी साकारला आपल्या मनातील बाप्पा - नैब स्कुल सातपूर
नाशिकमध्ये शाडू मातीपासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत अंध विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या मनातील बाप्पा साकारला.
यावेळी नाशिकच्या मूर्तिकार शिंदे कुटुंबीयांनी या विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करत या मुलींनी बाप्पाची मूर्ती साकारण्यास सुरवात केली. यावेळी स्नेहा शिंदे यांनी बाप्पाची मूर्ती साकारतांना बाप्पाच्या अवयवाची माहिती विद्यार्थीनींन करुन दिली. अवघ्या 20 मिनिटांत या विद्यार्थीनींन आपल्या मनातील बाप्पाला मूर्तीचे रूप दिले. स्वतः बनवलेल्या या मूर्तीची घरी प्रतिष्ठापणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मूर्तिकार स्नेहा शिंदे भालेराव, श्रद्धा शिंदे, सुवर्णा शिंदे, राहुल भालेकर, मुख्यध्यपिका वर्षा साळुंखे, शिक्षक अस्मिता सोनी, लता आव्हाड, लीना गायकवाड आदी उपस्थित होते.