नाशिक- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदारांचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. राज्यातील रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांची सेवा निश्चितच प्रशंसनीय आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेल, याची काटेकोर काळजी रेशन दुकानदारांनी घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
हेही वाचा-Global Covid-19 Tracker : जगभरात कोरोनामुळे 82 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
रेशन दुकानांमध्ये ब्लॅक मार्केटिंग होणार नाही. याचीही काळजी घ्यावी. तसेच नियमित नियतनातील धान्य नियमाप्रमाणे 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदुळ या दरानेच विकले जाईल याची दक्षता घ्यावी. सध्या सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत. या काळात आपण माणुसकीने वागून त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणे अपेक्षित आहे.
एकाने चूक केल्यास सर्व यंत्रणा बदनाम होते. अर्थात जे लोकं चुकीचे वागतात त्यांच्यावर नाईलाजाने कायदेशीर कठोर कारवाई करणे भाग पडते. रावेर तालुक्यातील वाघोदा येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जास्त पैसे घेतल्याबाबतचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकान रद्द करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे अशी वेळ येवू न देता प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये मोफत तांदुळ वाटपाचे काम सुरू झालेले आहे. उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच मोफत तांदुळ वाटप सुरू होणार आहे. राज्यात कुठेही स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रार येणार नाही व सामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळेल याबाबत दक्षता घ्यावी. काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.