नाशिक -कोरोनाविरोधात यशस्वीरीत्या लढण्याचे एक आगळेवेगळे उदाहरण मालेगाव शहराने सर्वांसमोर ठेवले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून, बकरी ईद देखील अतिशय संयमाने साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. मालेगाव येथील पोलीस अधिक्षक कार्यालयातील सुसंवाद हॉल येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
आपण कोरोना साथीपासून दूर झालो असलो, तरी अजून त्याचा धोका टळलेला नाही. सर्वांनी नियमांचे पालन करुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले. मालेगाव पॅटर्न बाबत मला नेहमी विचारणा होते. त्या वेळेला आम्ही लोकांनी कोरोनाच्या भितीवर केलेली ही मात आहे, असे सांगतो. कोरोनासारख्या महामारीवर मालेगाव पॅटर्नने जे नावलौकीक मिळविले आहे. ते अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून आरोग्य प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन होणे, आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
आज आपण पूर्णपणे कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेलो नसून बकरी ईदच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी करु नये. सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे. ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या चार महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी. महानगरपालिकेतर्फे आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशासनामार्फत जी काही मदत लागेल, ती केली जाईल. तरी सर्वांनी शासनाच्या दिलेल्या नियमांचे यथोचित पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.