नाशिक - गँस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून १३ लाखांची रोकड लुटल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या जेल रोड परिसरातील शिवाजीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम तोडून तब्बल 13 लाख रुपये घेऊन चोरटे फरार झाले आहेत. हा सर्व प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे.
नाशिकमध्ये एटीएम फोडून १३ लाखांची रोकड लुटली - नाशिक गुन्हे वार्ता
मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मशीन फोडून त्यातील १३ लाख रुपयांची रोकड लुटून अज्ञात चोर फरार झाले आहेत. ही घटना सकाळी उघडकीस आली.
जेलरोड भागातील मंजुळा मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या इमारतीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून त्यातील १३ लाख रुपयांची रोकड लुटून फरार झाले आहेत. ही घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस निरीक्षक सुधीर डुंबरे, उपनगर पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
विशेष म्हणजे या परिसरात रेल्वे टेशन असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम चा काही भाग कापून 13 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. ही सर्व चोरी करत असताना चोरट्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. भरवस्तीत एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन चोरी झाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. जेव्हा ही चोरी झाली त्या रात्री इथे कुठलाही सुरक्षारक्षक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.