नाशिक- दुष्काळी चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वॉटर क्लब स्पर्धेचे काम सुरू आहे. मतेवाडी येथे वन जमिनीत पाणी फाऊंडेशनचे काम सुरू असताना आदिवासी जमाव व मतेवाडी ग्रामस्थ यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ३५ आदिवासीं विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही मंडळी विरोधात देखील अनुसूचित जाती-जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणी फाउंडेशनच्या नावाखाली काही गावगुंडांनी फॉरेस्ट अधिकारी आणि स्थानिक भाजप आमदाराशी संगणमत करून आदिवासींच्या वहिती असलेल्या वनजमिनींवर खड्डे खणून त्यांना २६ एप्रिलला आणि काल ३ एप्रिल ला पुन्हा जबर मारहाण केली. त्यातील एक आदिवासी महिला रुग्णालयात दाखल आहे. असाच गंभीर हल्ला गावगुंडांनी येथील आदिवासींवर २००२ सालीही केला होता. तेव्हाही किसान सभेने लाल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा यशस्वी प्रतिकार केला होता. कालच्या हल्ल्याचाही किसान सभेने प्रतिकार केला आणि पुन्हा असे काही झाल्यास यापुढेही आम्ही प्रतिकार करणार, अशी ठाम भूमिका डॉ. अशोक ढवळे अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा यांनी सांगितले.