नाशिक -घुसखोरांना थांबविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश हितासाठी हा कायदा स्वीकारावा, असे आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. त्याचबरोबर सरकार वाचविण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार असल्याचेही शेलार यांनी सांगितले आहे. नाशकात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार भाजप सेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार -
शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेमध्ये समर्थन दिले. मात्र, राज्यसभेतून पळ काढला. त्यानंतर राज्यसभेत मोठ्या गोंधळात नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित झाले आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध दर्शविला आहे. याचा प्रभाव राज्यातील राजकारणावरही दिसून येत आहे. आता राष्ट्रपतींनी देखील या विधेयकावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील महाविकास आघाडीमध्येही मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशहितासाठी हा नागरिकत्व सुधारणा कायदा स्वीकारावा. यासाठी त्यांनी महाआघाडीतील पक्षांशी तडजोड करू नये. सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तडजोड करू नये. शिवसेनेने न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा. सरकार वाचविण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
हे वाचलं का? - मंत्रिमंडळात खांदेपालट.. जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली
सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू नसून राष्ट्र सुरक्षा हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसचे देशात भारत बचाव आंदोलन सुरू आहे. भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवण्याची काँग्रेसची भूमिका असून काँग्रेस पक्ष नौटंकी करत असल्याचे शेलार म्हणाले.