नांदगाव (नाशिक) - नांदगाव तालुक्यातील कोरोना योद्ध्या आशा गटप्रवर्तक यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून सामुदायिक राजिनामा दिला. यानंतर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या जवळपास 158 आशा सेविकांनीदेखील राजीनामा देत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे तालुक्याची वैद्यकीय दैना होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
नांदगाव तालुक्यातील १५८ कोरोना योध्दा म्हणून कार्यरत असलेल्या संपूर्ण आशासेविका यांनी आज नांदगाव पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी अशोक ससाणे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सामुदायिक राजीनामे दिले. मात्र, तुमच्या गटप्रर्वतक यांनी दिलेले राजीनामेच मी मान्य केले नाहीत. त्यामुळे तुमचे राजीनामे घेण्याचा प्रश्नच उरत नाही, अशी भूमिका ससाणे यांनी घेतली. मात्र, जोपर्यंत आमच्या गटप्रर्वतक आम्हाला येऊन आदेश देत नाही किवा आमच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत आम्हीदेखील येथून जाणार नाही, अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली. यामुळे बराच काळ आंदोलन सुरू होते. सायंकाळी तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन देऊन आजच्या दिवस वाट बघून उद्यापासून आमच्या जिल्ह्याचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली कामबंद आंदोलन करणार असल्याचे आशा सेविका यांनी सांगितले.