नाशिक - राष्ट्रवादीचे माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांची आज तब्बल २ तास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशी सुरू होती. चौकशी संपल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर पडताच माध्यमांचे कॅमेरे समोर दिसताच पिंगळे अवाक झाले. त्यांनी चौकशी वैगेरे काही नाही सहज आलो होतो, असे म्हणत माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांच्या प्रतिनिधीनी बोलते केल्याने पिंगळे संतापले.
नाशिकमध्ये एसीबीकडून राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळेंची २ तास चौकशी - Nashik Market Committee
राष्ट्रवादीचे नेते देविदास पिगळे यांची आज एसीबीकडून २ तास कसून चौकशी करण्यात आली.
मीडियाला काहीतरी उचलण्यासाठी चालू असते. २००९ पासून माझी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी व्हावी, असा अर्ज दिलेला होता. त्यासाठी मी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात काही कागदपत्रे देण्यासाठी आलो होतो, असे त्यांनी म्हटले. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीत अपहार प्रकरणाचा संबंध नाही, अपहार झालेला नाही, असा दावा देखील त्यांनी केला.
पिंगळे यांची यापूर्वी याच कार्यालयात कसून चौकशी झाली आहे. नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे वेतन, दिवाळी बोनस आणि भविष्य निर्वाह निधी याबाबत अपहार केला म्हणून त्यांच्यावर २०१६ मध्ये म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पिंगळे यांना पोलीस कोठडी देखील झाली होती. त्यांच्या घराची, फार्म हाऊस आणि बँक खात्यांची झडती घेतली गेली. दरम्यान, बेहिशेबी ५७ लाख रुपये रोकड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनात आढळून आली होती.