महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात पोलीसच असुरक्षित! गुन्हेगारांच्या टोळक्याचा पोलीस पथकावर हल्ला

या घटनेनंतर पोलिसांनी १३ आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन राबवत अटक केली असून यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत.

नाशिक

By

Published : Jun 11, 2019, 8:39 AM IST

नाशिक- गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली. शहरात पोलिसांवरच वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पोलीसच असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर पोलिसांच्या छावण्या उभ्या आहेत. त्याच रात्री शहराच्या मध्यवर्ती भागात एका टोळक्याने गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जबरी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी १३ आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन राबवत अटक केली असून यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी सांगितले.

या हल्ल्यातील जखमी सागर हजारी या पोलीस कर्मचाऱ्याचे वडील, भाऊ, वहिनी असे सर्वच कुटुंब पोलीस खात्यात असून या हल्ल्याच्या घटनेने त्यांचेही मनोबल खचले आहे. टोळक्याच्या हल्ल्यात सागर हजारी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांचे वडील अमरसिंह हजारी यांनी दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी शहरातील पोलीस असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याची भावना नाशिककर व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details