महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आराम नदीच्या बंधाऱ्यावर अडकला युवक; ६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश - सामाजिक कार्यकर्ते

खमताने येथील एक तरुण पूर पाहण्यासाठी आराम नदीजवळ गेला होता. तेव्हा अचानक नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तो बंधाऱ्यावर अडकला. तर ६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तरुणाला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

आराम नदीच्या बंधाऱ्यावर अडकला युवक

By

Published : Aug 5, 2019, 10:27 PM IST

Updated : Aug 5, 2019, 11:21 PM IST

नाशिक- सटाणा तालुक्यातील आराम नदी बंधाऱ्यावर एक तरुण पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना दुपारी २ वाजता समोर आली होती. त्यानंतर ६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तरुणाला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

नदीच्या बंधाऱ्यावर अडकलेल्या युवकाला ६ तासानी बाहेर काढण्यात यश

खमताने येथील मच्छिंद्र गायकवाड हा तरुण पूर पाहण्यासाठी आराम नदीजवळ गेला होता. तेव्हा अचानक नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तो बंधाऱ्यावर अडकला. तर या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन व सटाणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी पाणी जास्त असल्याने तरूणापर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे दोरीच्या सहाय्याने टायर फेकून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, दोरी व टायरच्या मदतीने हा तरुण नदीतून बाहेर येत असतानाच त्याचा हात टायरमधून सटकला आणि तो २० फूट खाली बंधाऱ्यात पडला. यावेळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असताना त्याने नदीतील एका झाडाला पकडले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने तरुणाला सुरक्षित बाहेर काढले.

६ तासांपासून आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक नागरिक या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. नशीब बलवत्तर म्हणून हा युवक वाचला, असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने यांनी सांगितले.

या युवकाला वाचविण्यासाठी सटाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस कर्मचारी, सरपंच शीतल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने तसेच गावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, वारंवार सूचना देऊनही नागरीक अशा प्रकारे जीव धोक्यात घालतात. त्यामुळे प्रशासनाने यावेळी नाराजी व्यक्त केली.

Last Updated : Aug 5, 2019, 11:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details