नाशिक -भाऊबीजेसाठी मालेगाव येथे बहिणीकडे जाणाऱ्या भावाची हत्या झाल्याची घटना घडली. अज्ञात मारेकऱ्यांनी गळा आवळून आत्महत्या दाखवण्याचा बनाव केल्याचे शवविच्छेदनानंतर समोर आले आहे. याप्रकरणी नाशकातील अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश वानखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो अंबड परिसरातील आशीर्वाद नगर भागातील रहिवासी आहे. तो भाऊबीजेला जाण्यासाठी निघाला होता. त्याचा भाऊ अमृत देखील बहिणीकडे जाणार होता. त्यासाठी अमृतने त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर बहिणीने फोन करून सांगितले की, रमेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृत रुग्णालयात पोहोचतपर्यंत रमेशचा मृत्यू झाला होता.