नाशिक- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही कायद्याचे उल्लंघन करून बैलगाडा शर्यत भरवल्याचा प्रकार दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला येथे घडला. या प्रकरणी ३ आयोजकांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कैलास जाधव यांनी या कारवाई बाबतची माहिती दिली.
दिंडोरी तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन, ८ जणांवर गुन्हा दाखल प्राप्त माहितीनुसार हस्तेदुमाला येथील सोनीराम गावित यांच्या मालकीच्या दगडमाळ शिवारात त्यांची परवानगी न घेता रामभाऊ गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, बाळू राऊत (सर्व रा. हस्तेदुमाला, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. याबाबत वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक शर्यतीच्या ठिकाणी रवाना झाले. शर्यत सुरू असतानाच पोलीस येत असल्याची चाहूल लागण्याने शर्यतीत सहभागी बैलगाडा चालक-मालक यांनी घटनास्थळावरून पळ काढला. तसेच प्रेक्षकांनीही घटनास्थळावरून धूम ठोकली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी सहा दुचाकी व दोन महिंद्र पिक-अप वाहने जप्त केली. पोलिसांसमक्षच दुचाकी घेऊन पळणाऱ्या प्रकाश कडाळे (रा. हस्तेदुमाला), जयराम गवळी (रा. टाक्याचा पाडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दोन पिक-अपही जप्त करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, जमावबंदी आदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत ३ आयोजक आणि मोहन राऊत (रा. नागईपाडा), पांडुरंग झिरवाळ (रा. खुंटीचा पाडा),रामचंद्र राऊत (रा. चिमणपाडा)या तिघा पिकअप चालकांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ८ जणांच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनास्थळावर दुचाकी सोडून पळून जाणाऱ्या संशयितांचीही नोंद घेण्यात आली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कैलास व्ही जाधव व पोलीस शिपाई दिलीप राऊत करित आहेत