नाशिक - मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसत आहे. मालेगावात कोरोनाचा कहर सुरू होता, तेव्हा नाशिक ग्रामीणचे पोलीस जीवाची बाजी लावून याठिकाणी कर्तव्य बजावत होते. त्यात अनेकांना कोरोनाची लगाणही झाली व काही कोरोनामुक्तही झाले. आता तेच पोलीस सामाजिक बांधिलकी राखत प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने कहर केला होता. दिवसाला सुमारे 100 हून अधिक बाधितांची भर मालेगावात पडत होती. त्यामुळे या ठिकाणच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाने देखील प्रयत्न सुरू केले होते. यात पोलीस आणि आरोग्य विभाग तर आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र याठिकाणी आपले कर्तव्य बजावत होतो. यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली व बरेही झाले. यात शंभरहून अधिक ग्रामीण पोलिसांचाही समावेश आहे.
राज्यात प्लाझ्मा थेरपीमुळे अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्य शासनाने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर नाशकातील डॉक्टर व पोलिसांनी सामाजिक भार राखत प्लाझ्मा दान करण्यास सुरूवात केली आहे. नाशिक ग्रामीणच्या 82 पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.