नाशिक- चंदनपुरी शिवारातील पेट्रोल पंपावरील कॅशिअर लुटीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा मास्टरमाईंड त्या पंपावरील कामगारच निघाला असून त्याच्यासह एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. तर एक साथीदार फरार आहे. या लुटीतील ७० हजार रुपयासंह दुचाकी व एक टॅब, असा 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मालेगावातील पेट्रोल पंप कॅशिअर लुट प्रकरण; दोघांना अटक, एक फरार चंद्रपुरी शिवारातील सावकार पेट्रोल पंपावरील कॅशिअर राहुल पारख हे 21 मार्च रोजी रात्री दिवसभराच्या हिशोबाचे 2 लाख 80 हजार रुपये मालकाकडे देण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यावेळी मन्सूरा कॉलेज रोडवरील शेतकी कॉलेज परिसरात 2 अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करत, त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग आणि टॅब पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने सर्वत्र तपास केला. त्यानुसार त्यांना खबरीमार्फत आरोपी सुजन थिएटरजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने मोसम पुल ते मनमाड चौफुली रोडजवळ सापळा रचला. त्यावेळी या ठिकाणी संशयित शेख अझरुद्दीन शेख शहाबुद्दीन (वय - 20, मालेगाव) हा दुचाकीवरून येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
यानंतर आरोपीने साथीदार युसूफ भुऱ्या यांच्यासमवेत कॅशिअरला लुटण्याची कबुली दिली. हा सर्व प्लॅन त्याच पेट्रोलपंपावरील कर्मचारी अंकुश बापू वाघ (वय-22, कुंजर चाळीसगाव. सध्या रा, चंदनपुरी शिवार) याच्या माहितीवरून हा कट रचल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार सुहास वसंत महाले, पोलीस नाईक राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, हेमंत गिलबले, रतिलाल वाघ यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.