नाशिक - शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत असुन 21 जूनला जिल्ह्यात एकाच दिवशी 131 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. तसेच रविवारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. 131 रुग्णांपैकी सर्वांत जास्त 108 रुग्ण हे नाशिक शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 165 जणांचा मृत्यू झाला आहे.
मालेगावनंतर नाशिक शहर हे कोरोना हॉटस्पॉट ठरलं आहे. शहरात दिवसागणीक कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत 2 हजार 766 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब म्हणजे, यातील 1 हजार 621 रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. तर 1 हजार 264 रुग्णांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नाशिक शहरासोबत ग्रामीण भागात देखील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असून जिल्हा आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे.