नंदुरबार- लग्नानंतर अवघ्या काहीच महिन्यात एचआयव्हीची लागण झाल्यामुळे पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या दामिनीसही एड्सची लागण झाली. सासरच्या लोकांनी पाठ फिरवली, जवळच्या नातेवाईकांचा पाहण्याचा दुष्टीकोन बदला, समाजही वेगळ्या नजरेने पाहू लागला. वयोवृद्ध बापाने साथ दिली आणि या 'दामिनी'च्या जीवनात एक नवीन पालवी फुटली. आज हीच 'दामिनी' उत्तर महाराष्ट्रातील पाच हजारांपेक्षा अधिक एड्स बाधितांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. महिला दिनानिमित्त पाहू या रणरागिणीचा संघर्षमय जीवनावर खास रिपोर्ट...
नंदुरबार शहरापासून आवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भोणे गावातील एका परिवारातील मुलीचा विवाह 2000 मध्ये हतनूर गावात झाला. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत दामिनीच्या (नाव बदललेले) पतीचे एचआयव्हीमुळे निधन झाले. पतीच्या निधनामुळे त्या तरुण वयातच विधवा झाली. पतीपासून दामिनीलाही एड्सची लागण झाली. तिच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी दामिनीकडे पाठ फिरवली. मात्र, वडील दामिनीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी एका संस्थेतून तिच्यावर समुपदेशन केले. तिथूनच दामिनीच्या जीवनात बदल झाला. त्यानंतर दामिनीनेही एड्सग्रस्तांसाठी काम करणे सुरू केले. मुलीला समाजातील इतर एड्सबाधितांसाठी कार्य करत असल्याने तिच्या वडिलांना आपल्यावर गर्व असल्याचे तिने सांगितले.