नंदुरबार - शहादा तालुक्यातील उभा दगड आणि धोनोरा बुद्रुक ही दोन गाव स्वातंत्र्यापासून आजघडीपर्यंत विकासापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, उभा दगड या गावातून आचार्य विनोबा भावे यांनी जंगल सत्यागृहाचा शुभारंभ केला होता. इतिहासाच्या पानात नोंद असलेले हे गावच विकासापासून कोसो दूर आहे. राजकीय नेते फक्त निवडणूकीत आश्वासन देतात पण यावर काहीच करत नाहीत, अशी ओरड ग्रामस्थांची आहे.
शहादा तालुक्यात उभा दगड आणि धानोरा बुद्रुक ही दोन गाव येतात. या गावात स्वातंत्र्यापासून विकास झालेला नाही. ही दोनही गाव वनक्षेत्रात येतात. यामुळे त्यांना अजूनही महसूली दर्जा प्राप्त झालेला नाही. या कारणाने या गावात आतापर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात येऊ शकलेली नाही.
साडेसातशे लोकवस्ती असलेल्या उभा दगड गावात जाण्यासाठी अद्याप चांगला रस्ता नाही. तसेच नदीवर पूलदेखील नाही. यामुळे पावसाळ्यात त्या गावात राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर वीज, पाणी आणि आरोग्य केंद्र यासारख्या सुविधापासून येथील नागरिक वंचित आहेत.