नंदुरबार- लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या काळात भाजीपाल्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही आपला माल विक्री करता येत नसल्याने शहादा नगरपालिकेने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. शहादा नगरपालिका आणि कृषी विभाग शहादा यांच्यामार्फत 'घरपोच भाजीपाला' हा उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दीडशे रुपयात मिळणार आठ प्रकारच्या भाज्या हेही वाचा-पुणे शहरात आज नवीन 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले - डॉ. दीपक म्हैसेकर
शहादा येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शहादा परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना भाजीपाला विकणे कठीण झाले होते. मार्केट बंद असल्यामुळे भाजीपाल्या विकायचा तर कुठे, संचारबंदी असल्यामुळे भाजीपाला घेऊन जायच्या कुठे? असा प्रश्न बळीराजा समोर होता. त्यावर उपाय म्हणून शहादा नगरपालिका व कृषी विभागाने शेतकरी व बचत गट यांच्या समन्वयाने भाजीपाला पॅकिंग करुन तो थेट घरोघरी जाऊन विकण्याच्या उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला विकला जातो व सामान्य नागरिकाला भाजीपालाही मिळतो असे समीकरण जुळविण्यात आले आहे. यावेळी खबरदारी म्हणून भाजीपाला पॅकिंग करणाऱ्या, विक्री करणाऱ्या या सर्वांची योग्य ती खबरदारी घेऊन ते कोणाच्या संपर्कात येणार नाहीत याचीदेखील दक्षता घेतली जात आहे.
शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. लॉकडाऊन आणि शहादा शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर भाजीपाला मार्केट बंद करण्यात आले होते. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र, आता यावर उपाय निघाला आहे. त्यामुळे दीडशे रुपयात आठ प्रकारच्या भाज्या ग्राहकांना मिळणार आहेत, अशी माहिती शेतकरी समन्वयक व जिल्हा परिषद सभापती अभिजीत पाटील यांनी दिली.