नंदुरबार -दरवर्षीनवरात्रोत्सवादरम्यान खोडाई देवीची यात्रा भरते. मात्र कोरोनामुळे यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो वर्षांपासून नंदनगरीत भरणाऱ्या खोडाई देवीच्या यात्रेत कोरोनामुळे खंड पडला आहे.
नंदुरबार शहराची ग्रामदेवता असलेल्या खोडाई देवीची यात्रा नवरात्रोत्सवातील दहा दिवस भरत असते. दरवर्षी यात्रेनिमित्त विविध जिल्ह्यातील मनोरंजनाची साधने व साहित्य विक्रीसाठी व्यापारी नंदुरबार शहरात येतात. मंदिर परिसरासह यशवंत विद्यालयांचे प्रांगण दहा दिवसांपर्यंत यात्रेने गजबजलेले असते. घटस्थापनेपासून दररोज पहाटेच्या सुमारास देवीची पूजा करण्यासाठी येतात. तसेच दिवसभर महिला, पुरुष भाविकांची दर्शनासाठी लगबग असते. विजयादशमीला रावण दहनानंतर सीमोल्लंघनाने खोडाई देवीच्या यात्रेची सांगता होते.
खोडाई देवी मंदिर व्यवस्थापक वसंत गोहिल यांची प्रतिक्रिया कोरोनामुळे यावर्षी सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. गेल्या 8 महिन्यांपासून प्रार्थनास्थळे बंद असून अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिर व नगरपालिका प्रशासनाने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंदिराला बॅरिकेटींग करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरुनच भाविकांना देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवरात्रोत्सवातील गरबा नृत्यांचे आयोजन करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी नवरात्रीचे नऊ दिवस भाविकांना घरी राहूनच देवीची पूजा करावी लागणार आहे.
वाघेश्वरी देवीचे मंदिर केवळ आरतीसाठी उघडणार
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात असलेल्या उंच डोंगरावर वाघेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवरात्रोत्सवात दरवर्षी नवरात्रीचे 9 दिवसांपर्यंत वाघेश्वरी मंदिरात उत्सव साजरे करण्यात येतात; परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार श्री वाघेश्वरी देवी मंदिरातील नवरात्रोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सव काळात वाघेश्वरी देवीची दररोज सकाळी व सायंकाळी पूजा व आरती करण्यासाठी देवीचे मंदिर उघडण्यात येणार असून इतर वेळी मंदिर बंद राहणार आहे. मंदिर उघडण्यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांना सोशल डिस्टन्सिंग व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेता येईल, अशी माहिती श्री वाघेश्वरी सेवा संस्थानचे अध्यक्ष किशोरभाई वाणी यांनी दिली आहे.