नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामुळे जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. शिवसेना ज्या राजकीय पक्षासोबत जाईल त्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेत येणार आहे. तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलताताई पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपही 23 जागांवर विजयी झाली आहे. सेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी झाली आहे. निवडणुकीपूर्वी नवापूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत या नाट्यात राष्ट्रवादी, भाजपसोबतच राहील असे संकेत दिले जात आहेत. मात्र, सेना आपल्याला हवी असलेली पदे जो राजकीय पक्ष देईल त्यासोबत जाईल, असे चित्र दिसून येत आहे.
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस नेते के. सी. पाडवी हे गुंतून राहिल्याने त्यांना पक्षाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात योग्य वेळ मिळाला नाही. यामुळे काँग्रेसला बहुमत आतापर्यंत पोहोचता आले नाही, असा कयास लावला जात आहे.
घराणेशाही दिसली -
जिल्हा परिषद निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षातील घराणेशाही दिसून आली. त्यात भाजप नेते विजयकुमार गावित यांच्या परिवारातील 4 सदस्य निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यात त्यांची पत्नी, 2 पुतणे आणि भावाची पत्नी असे गावित परिवारातील सदस्य जिल्हा परिषदेत दिसणार आहेत. तर नवापूर ते काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक यांचे दोन्ही बंधू विजयी झाले आहेत. तसेच माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवीही विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा -राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा 'धुरळा', नागपुरात गडकरींसह फडणवीसांना धक्का
जिल्हा परिषद निवडणूक निकालाचे वैशिष्ट्य -
- विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप आणि सेनेत गेले. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पक्षात नेतृत्व राहिले नव्हते. काँग्रेसचे नेते आणि मंत्री के. सी. पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार शिरीष नाईक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत संघर्ष करत काँग्रेसला सर्वाधिक 23 जागा जिंकून दिल्या.
- जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात शिवसेनेचे 7 उमेदवार जिंकून आलेले आहेत.
- जिल्ह्यात भाजपाचे 2 आमदार, 1 खासदार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सुद्धा भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही.
- नवापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची आघाडी होती. नवापूर तालुक्यातील 10 गटांपैकी 5 गटात भाजप तर 5 गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निवडणूक लढली होते. याठिकाणी राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या. तर नवापूर तालुक्यात भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.
- या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढल्याने जिल्हा परिषदेच्या 56 गटात चौरंगी लढती झाली. त्यात मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते.
- महाविकास आघाडी एकत्र लढली असती तर नंदुरबार जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता आली असती. यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात आहेत. शिवसेना ज्या पक्षासोबत जाईल त्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर येईल.
हेही वाचा -"नाराज मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार"
जिल्ह्यातील 6 पंचायत समितीचे निकाल -
- नवापूर (सत्ता कायम) - काँग्रेस
- अक्कलकुवा - (सत्ता कायम)
- नंदुरबार, शहादा - भाजप
- धडगाव - शिवसेना
- तळोदा - काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 5 जागा त्यामुळे याठिकाणी बरोबरी झाली आहे.