नंदुरबार - संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. जिल्ह्याचा तापमानाचा पाराही ४४ अंशांवर गेल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला. यामुळे नेत्यांच्या प्रचाराला कमी गर्दी होताना दिसली.
नंदुरबारमध्ये तापमानवाढीचा प्रचाराला फटका, उष्णतेमुळे नेत्यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांची अनुपस्थिती - सुहास नटावदकर
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशांवर गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या ४ दिवसांच्या प्रचारात उमेदवारांना वाढत्या तापमानाचा फटका बसला. या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार उभे आहेत. पण कोणत्याच उमेदवाराकडून यावेळी मोठा प्रचार झाला नाही. त्यामुळे हे उमेदवार आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचू शकले नाही.
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी, भाजप उमेदवार डॉ. हिना गावित, अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांनी अनेक ठिकाणी पदयात्रा आणि मोटार सायकल रॅली काढल्या. आज या उमेदवारांनी अक्कलकुवा, शहादा, धडगाव, तळोदा, शिरपूर आणि साक्री या ठिकाणी रॅली काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.