नंदुरबार- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी बंडखोरी केली आहे. नागेश पाडवी यांच्या मनधरणीसाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले गेले होते. त्यासाठी खासदार डॉक्टर हिना गावित दिवसभर अक्कलकुवा येथे ठाण मांडून बसल्या होत्या.
उमेदवारी माघारीच्या एक दिवस अगोदर नागेश पाडवी हे पक्षाच्या आणि आमच्या संपर्कात होते. जिल्ह्याचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यांना नंदुरबार येथील निवासस्थानी बोलून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सांगितले होते. त्यांच्यासोबत असलेल्या भाजपच्या पदाधिकार्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ, असा शब्द विजयकुमार गावित यांना दिला होता. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी माघारीच्या दिवशी नागेश पाडवी, हे नॉटरिचेबल झाले होते. त्यांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्याने आणि पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा कारणावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ. हिना गावित यांनी दिली आहे.