नंदुरबार - मकरसंक्रांतीला उडविण्यात येणार्या पतंगांच्या मांजामुळे जखमी झालेल्या अनेक पक्ष्यांवर औषधोपचार करून जीवदान देण्यात आले. हा उपक्रम शहरातील विविध सामाजिकदायित्व निभविणारे सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांनी 'बर्ड कॅम्पच्या' माध्यमातून राबविला होता. या कॅम्पमध्ये जखमी झालेल्या घुबड, चिमणी, कबूतर आदी पक्ष्यांचे प्राण वाचविण्यात आले. या कॅम्पचे हे ८ वे वर्ष असून त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि पक्ष्यांप्रती प्रेम व्यक्त करणारा ठरला आहे.
नंदुरबार येथील श्री यंग अलर्ट ग्रुप, श्री महावीर सेना ग्रुप, श्री ज्ञानहंस ग्रुप यांच्यावतीने मकरसंक्रांतीला 'बर्ड कॅम्प'चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जयवंत चौकातील अजितनाथ जैन मंदिर परिसरात बर्ड कॅम्पला सुरुवात झाली. गगनभरारी घेणारे पक्षी आकाशात उडणार्या पतंगांच्या मांजामुळे जखमी होतात. असेच काही पक्षी संक्रांतीच्या दिवशी शहरातील काही परिसरात जखमी होऊन पडले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी बर्ड कॅम्पच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधून जखमी पक्ष्यांबाबत माहिती दिली. यावेळी या पक्षांना बर्ड कॅम्पमध्ये आणून उपचार करण्यात आले.