नंदुरबार - शहरातील एका मंदिरात स्वतःवर गोळी झाडून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हरदेवसिंग नरेंद्रसिंग विरदी (वय 35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मध्यप्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील डवरा येथील हरदेवसिंग हा काल सायंकाळी नवी सिंधी कॉलनीजवळ असलेल्या एका मंदिरात दर्शनासाठी आला होता. मंदिरात आल्यानंतर त्याने गावठी पिस्तूलने स्वतःच्या छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात हरदेवसिंग खाली कोसळला, दरम्यान गावठी कट्ट्यामधून गोळी सुटल्याचा आवाज झाल्यानंतर मंदिराबाहेरील नागरीक मंदिरात पळत आले. यावेळी हरदेवसिंग हा खाली पडलेला दिसला. परिसरात घटनेची वार्ता कळताच मंदिरात एकच गर्दी झाली.
पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली आणि हरदेवसिंग यास उपचाराकरता नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच हरदेवसिंग यांची प्राणज्योत मालवली होती. मृत हरदेवसिंग हे नंदुरबार येथे मेहुण्याकडे आले होते, त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येप्रकरणी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असा उल्लेख केला आहे.