नंदुरबार - गावात रस्ता नाही. मोठमोठे दगड, दऱ्या, खोरे पार करत, डोंगर चढून प्रवास करावा लागतोय. त्यात कोणी आजारी असेल तर त्याला खांद्यावर नाहीतर 'बांबूलन्स' (बांबूची झोळी)मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही. प्रसंगी अनेकांचा जीवही जातो. ही वाईट अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम भागातील गावांची...
महाराष्ट्रातील तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र, त्यापुढे काय? त्यापुढे असलेल्या नागरी वस्तीत रस्ते आहेत की नाही, याकडे कोणाचेच लक्ष नाही. सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा राज्यकर्त्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, येथील गावांची स्थिती पाहिल्यानंतर हे दावे फोल ठरतात. सरकारचे या गावांकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिणामी, कोणीही आजारी पडल्यास आताही बांबूच्या झोळीमधून रुग्णालयात पोहोचवले जाते. सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतर चालून ग्रामस्थ रुग्णाला मुख्य रस्त्यापर्यंत आणतात. यामधील अनेकांना उपचार मिळत नाही. कोणाचा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच जीव जातो.