नंदुरबार - जिल्ह्यातल्या आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाचे सुरु असेलले धाडसत्र शनिवारी रात्री उशीरा पूर्ण झाले. 70 तासांनंतर या साखर कारखान्यात ठिय्या मांडून असलेले आयकर विभागाचे अधिकारी शनिवारी रात्री १० च्या सुमारास बाहेर पडले. सहा आयकर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारखान्याच्या कार्यालयात कागदपत्र आणि संगणकांची झाडाझडती घेतली आहे. संगणकाच्या हार्ड डिस्क देखील त्यांनी आपल्या ताब्यात घेत सोबत नेल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडुन मिळाली आहे. मात्र याबाबत आयकर विभाग किंवा आयान मल्टीट्रेडच्या साखर कारखान्याच्या अधिकारी यांनी माध्यमांना कुठलीही माहिती अद्याप दिलेली नाही. हा कारखाना पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाचा असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून आयर्न मल्टीट्रेड एल पी साखर कारखान्यावर आयकर विभागातर्फे चौकशी सुरू होती. सत्तर तासांपेक्षा अधिक आयकर विभागाचे अधिकारी कारखाना कार्यालयात ठाण मांडून बसले होते. कारखान्यात असलेले संगणक व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. याबाबत मात्र आयकर विभागाच्या अधिकारी व कारखाना प्रशासनाकडून कुठलीही माहिती माध्यमांना देण्यात आली नाही. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाचे पथक कारखान्यांमधून बाहेर पडले. मात्र कारखान्यातुन आयकर अधिकारी काय घेऊन केले व काय चौकशी केली याबाबत मात्र कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही.
पुष्पदंतेश्वरचे झाले आयान नामकरण-
पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना १९९६ मध्ये सुरू झाला. या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मोहनभाई चौधरी हे होते. या कारखान्याची बाराशे मेट्रीक टन प्रति दिवस गाळप क्षमता आहे. सन २०१४ -१५ मध्ये आघाडीच्या शासन कार्यकाळात अवसायानात गेल्याने कारखान्याची विक्री करण्यात आली होता. त्यावेळी अँस्टोरिया शुगर नावाने हा कारखाना विकत घेण्यात आला. परंतु त्यासाठी पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतल होते. सदर कारखाना 47 कोटी रुपयात विक्री करण्यात आला होता. दीडशे दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या साखर कारखाना केवळ 47 कोटी रुपयात कसा विक्री झाला? याबाबत विविध तर्क वितर्क लावले गेले होते.