नंदुरबार :महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा प्रादुर्भाव गुजरात राज्यात पसरू नये, यासाठी गुजरात प्रशासनाच्या वतीने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीमेवर एक आरोग्य पथक देखील नेमण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व वाहनचालकाची तपासणी करून, त्याच्याकडे असलेल्या अहवालाची पडताळणी करत वाहन चालकाची व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. ज्या वाहन चालकांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल त्यांना माघारी पाठवण्यात येत आहे.
कोरोना चाचणी अहवाल नसलेल्यांना गुजरात राज्यात प्रवेश बंदी..
महाराष्ट्र राज्यात दररोज कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने गुजरात सरकारकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाणारे प्रवाशांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. अहवाल नसल्यास परतीचा प्रवास करावा लागणार आहे. असे परिपत्रक गुजरात आरोग्य विभागाने काढले आहे. यावर गुजरात पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.
आरोग्य व पोलिस पथक तैनात..
उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाची व प्रवाशांची थर्मल केंद्राद्वारे चाचणी करण्यात येत आहे. तसेच पोलिसांतर्फे मास्कविना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अहवाल निगेटिव्ह असला तरच राज्यात प्रवेश..