नंदुरबार -पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबत विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्याच्या अनुशंगाने आज नंदुबारमध्ये ७ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारण्याचा अनुभव घेतला. या गणेश मूर्ती विक्रीतून येणारा पैसा सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य खरेदीसाठी वापरला जाणार आहे.
अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ, त्रंबकेश्वर यांच्या मार्फत आज नंदुरबारमध्ये एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत आज नंदुरबारमधील ७ हजारांहुन अधिक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारल्या. या मूर्ती बनवतांना विद्यार्थ्यांमध्ये अनोख्या प्रकारचा उत्साह पहायला मिळाला. पर्यावरण संरक्षणासोबतच, संस्कृती ओळख आणि सोबतच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव हा या उपक्रमा मागील विविधांगी हेतु होता. या उपक्रमात सात हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी गणराय साकारतांनाच विहंगम दृश्य देखील बरेच काही सांगुन जात होते. आपला आवडते दैवत गणराय स्वतच्या हाताने साकारण्याची अनुभुती विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होती.