नंदुरबार - जिल्ह्यासमोरचे कोरोनाचे संकट मागील 15 दिवसांपासून अधिकाधिक गडद होत आहे. बुधवारी मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढले आहेत. 18 रुग्ण वाढल्याने नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा 100 चा टप्पा पूर्ण झाला आहे. एकाच दिवसात 18 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 107 वर गेली आहे.आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
नंदुरबार शहरासह जिल्हावासियांना कोरोनाला रोखण्यासाठी अधिकच खबरदारी घ्यावी लागणार आहे. देशासह राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना नंदुरबार जिल्हा मार्च ते एप्रिल या महिन्यात ग्रीन झोनमध्ये होता. मात्र,एप्रिलच्या अखेरीनंतर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. तेव्हापासून नंदुरबार शहरासह शहादा व अक्कलकुवा येथे रूग्ण आढळल्याने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला होता.
बुधवारी रात्री आलेल्या अहवालात नंदुरबार जिल्हा रूग्णालयातील तब्बल 10 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तर तळोद्यातील 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात जिल्हा रूग्णालयातील 10 कर्मचार्यांचा समावेश आहे. तळोदा शहरातील मोठा माळीवाड्यात 33 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष व खान्देश गल्लीतील 54 वर्षीय पुरूष, 51 वर्षीय पुरूष तर तळोद्यातील भोई गल्लीतील 45 वर्षीय पुरूष अशा पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.