नंदुरबार - राज्य सरकारने शाळा डिजिटल पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागात मोबाईल रेंज आणि वीज नाही अशा भागात ऑनलाईन शिक्षण कशा पद्धतीने दिले जाईल, असा प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकार आता ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचे नियोजन करत आहे. मात्र, जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा तालुक्याचा भाग सोडला तर बाकी तालुके आदिवासी दुर्गम आहेत. याठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही, अशा ठिकाणी मोठी समस्या निर्माण होऊन विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल आणि हे ऑनलाइन शिक्षण फक्त कागदावर राहील, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या लतिका राजपूत यांनी व्यक्त केली आहे.
दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा - नंदूरबार न्यूज
नंदुरबार आणि शहादा तालुक्याचा भाग सोडला तर बाकी तालुके आदिवासी दुर्गम आहेत. याठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही, अशा ठिकाणी मोठी समस्या निर्माण होऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होईल आणि हे ऑनलाइन शिक्षण फक्त कागदावर राहील, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या लतिका राजपूत यांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबार जिल्हा भौगालिकदृष्ट्या डोंगराळ आणि अतिदुर्गम आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार त्यासाठी विशेष अशी उपाययोजना करावी लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय आदिवासी आश्रमशाळा असून त्या निवासी आहेत. कोरोनाच्या काळात या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी पाडवी यांनी दिली आहे.
राज्य सरकार ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रस्ताव आणत असले तरी आदिवासी भागात ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यामुळे राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे.