नंदूरबार- जुन्या काळातील वस्तू गड-किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीसाठी कमी असले तरीही राजा-महाराजांच्या काळात बांधलेल्या वस्तू आणि किल्ले आजही किती मजबूत आहेत. याचे उदाहरण म्हणजे गुजरात राज्यातील उकाई धरणात पाण्याखाली गेलेला पिलाजीराव गायकवाड संस्थानचा किल्ला. दुष्काळी परिस्थितीमध्ये उकाई धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने, दिसू लागला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
उकाई धरणातील पाणी कमी झाल्याने, पिलाजीराव गायकवाड संस्थानच्या 'किल्ल्या'चे दर्शन
महाराष्ट्रातील नवापूर तालुक्यातहून शेजारच्या गुजरात राज्यातील उच्छल तालुक्यातील जामली गावापर्यंत खडतर पायी रस्ता काढत उकाई धरणाजवळ पोहोचल्यानंतर किनाऱ्यावरून पाण्यात अर्धवट बाहेर आलेला किल्ला दिसून येतो. आतमध्ये किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या नवीन व्यक्तीला आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की, धरणाच्या एवढ्या पाण्यात किल्ला कसा बांधला असेल? मात्र, या किल्ल्याचा इतिहास काही वेगळेच सांगून जातो.
पिलाजीराव गायकवाड यांनी इसवी सन 1729 ते 1766 दरम्यान सोनगड किल्ल्याची निर्मिती केली. त्यादरम्यान उत्तर दिशेकडून येणार्या शत्रूंवर आक्रमण करण्यासाठी जामली किल्ल्याची निर्मिती झाली होती. पिलाजी गायकवाड यांनी राज पिंपळाच्या राजाच्या मदतीने 1720 साली सुरत प्रांतावर स्वारी करून आपले वर्चस्व गाजवत, पुढे अहमदाबाद येथे आपला गुमस्ता ठेवला, अशी माहिती जाणकारांकडून मिळते. उकाई धरणाच्या निर्मिती अगोदर ह्या किल्ल्यातील वस्तू येथील लोकांनी जवळून पाहिल्या आहे.
शासनाचा पुरानकालीन वास्तूकडे दुर्लक्ष -
1960 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या संकल्पनेतून उकाई धरणाची निर्मिती झाली. त्यावेळी पिलाजीराव गायकवाड संस्थानाच्या कार्यकाळात उभारण्यात आलेला हा किल्ला उकाई धरणाच्या पाण्याखाली बुडून लोकांना दिसेनासा झाला. या किल्ल्यातील वस्तू जतन करण्यासाठी शासनाद्वारे कोणताही प्रयत्न केला गेला नाही. उलट पाण्याखाली बुडवून इतिहास बुजवण्याचे काम केले. मात्र, ज्यावेळी निसर्गाचा कोप अति होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पाण्याची पातळी खाली जाते. त्यावेळी हा किल्ला शासनाला आणि नागरिकांना दर्शन देतो. या किल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर पिलाजी गायकवाड संस्थानच्या आठवणी ताज्या होतात.
उकाई धरणातील पाणी कमी झाल्याने, पिलाजीराव गायकवाड संस्थानच्या 'किल्ल्या'चे दर्शन
1959 पासून चार वेळा दिसला किल्ला -
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेल्या तापी नदीवर उकाई धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वर्षी महाराष्ट्र गुजरात राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा या धरणातील पाण्याची पातळी खाली जाते आणि पिलाजीराव गायकवाड यांचा हा किल्ला दर्शन देतो. 1959 पासून आतापर्यंत 4 वेळा या किल्ल्याने पाण्यातूनवर येत इतिहासाची उजळणी केली आहे. आदी 1997, 2017, 2018 आणि यंदा 2019 मध्ये दर्शन घडले आहे.
उकाई धरणातील पाणी कमी झाल्याने, पिलाजीराव गायकवाड संस्थानच्या 'किल्ल्या'चे दर्शन
हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, प्रशासनाद्वारे याठिकाणी उपाययोजना नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची बोट उलटून 4 जणांनी आपला जीव गमावला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे.