नंदुरबार- ग्रामीण भागातील नागरिकांना सोयी सुविधा पासून कसे वंचित ठेवण्यात येते याचे जिवंत उदाहरण धडगाव तालुक्यात दिसून आले आहे. याठिकाणी ५० खाटांचे महिला रूग्णालयाचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु, केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठ्याची जोडणी नवीन इमारतीला झालेली नाही. त्यामुळे रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकले नाही.
सातपुड्याच्या धडगाव तालुक्यात माता व बालमृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे. परंतु तेथे खाटांची संख्या आणि डॉक्टरांची संख्याही कमी आहे. त्यामुळे नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाकडून योग्य ती सेवा मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने याठिकाणी ५० खाटांचे महिला रुग्णालय बांधण्यास २०१२ मध्ये मंजुरी दिली. त्यानुसार नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु, मागील ५ वर्ष या रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू राहिले. तर गेल्या दीड वर्षापासून या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठयाची जोडणी नवीन इमारतीला झालेली नाही. त्यामुळे रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकले नाही.