नंदुरबार -जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशीही कोरोनामुळे एक मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. सायंकाळी 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने चिंताग्रस्त नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनाचा आठवा बळी गेला असला तरी बाधितांपैकी बरे होणार्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात कोरोनाच्या आकडेवारीने शंभरी पार केली. सध्या रुग्णसंख्या 163 वर पोहोचली आहे. दररोज येणार्या अहवालांमध्ये काही जण पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह येत असल्याने थोडी चिंता वाढतेय तर थोडा दिलासा मिळत आहे.
नंदुरबार तालुक्यातील धुळवद येथील एका 47 वर्षीय कोरोनाबाधित पुरूषाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला एक दिवस उलटत नाही, तितक्यात गुरुवारी पुन्हा कोरोनामुळे आणखी एक बळी गेला. नंदुरबार येथील मंगळबाजार परिसरात राहणारी 45 वर्षीय महिला सहा दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित आढळली होती. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान गुरुवारी महिलेचा मृत्यू झाला. यामुळे नंदुरबारकरांमध्ये कोरोनाची चिंता वाढली. जिल्ह्यात कोरोनामुळे 8 मृत्यू झाल्याने खबरदारी घेणे अधिक महत्वाचे आहे.