नंदुरबार: अतिदुर्गम भागाला जोडला जाणारा अत्यंत महत्त्वाचा रोषमाळ-कोठार तळोदा रस्त्यालगत चाँदशैली घाटातील वाहतूक उद्यापासून बंद असेल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या घाटात गॅबियन व संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या घाटतील वाहतूक 28 जुलै ते 28 ऑगस्ट 2023 या कालावधीत बंद असेल. परंतु फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या वाहतुकीसाठी येथील वाहतूक चालू असणार असल्याचे, आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
Chandsaili Ghat News: चाँदशैली घाटात 28 ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद; फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतूक सुरू - कलेक्टर
नंदुरबारमधील चाँदशैली घाटातील वाहतूक 28 जुलै ते 28 ऑगस्ट 2023 बंद राहणार आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम केले जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतूक या घाटातून होणार आहे.
वाहतूक बंदचे आदेश: गेल्या वर्षीही जिल्हाधिकाऱ्यांनी या चाँदशैली घाटाला वाहतूक मार्ग बंद करण्यात आला होता. तसेच पोलीस प्रशासनाच्या श्रमदानातून चाँदशैली घाटाची दुरुस्ती करण्यात आली होती. डोंगराळ परिसरात पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. या परिसरातील घाटात काम चालू असताना दगड आणि माती रस्त्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील धोकादायक वळणावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी गॅबियन, संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जात आहे. बांधकामामुळे मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. या मार्गावरील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांची वाहतूक बंद राहील. ही वाहतूक 28 जुलै 2023 पासून ते 28 ऑगस्ट 2023 पर्यंत रोषमाळ-कोठार-तळोदा चाँदशैली घाटातील वाहनांची वाहतूक बंद करून ती इतर मार्गाने वळविणे बाबत आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी जारी केले आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक: या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्नीशमक, गॅस सिलेंडर वाहतूक,अन्न व धान्य वितरण या सारख्या वाहनांसाठी वाहतूक सुरू राहील. या मार्गावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिशादर्शक फलक आणि बॅरिगेटर्स लावून वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. तसेच आवश्यकतेनुसार पथकेही नियुक्त करावीत. याठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवावा. कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील रस्त्यांच्या दुरूस्तीचे आणि गॅबियन व संरक्षण भिंतीचे काम मुदतीत पूर्ण करावे. या मार्गावरील ज्या-ज्या ठिकाणी भूस्खलन व अपघात प्रवण क्षेत्र आहे. त्या ठिकाणी केले जाणारे बांधकाम वेळेत पूर्ण करावीत, असे श्रीमती खत्री यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यार पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून चाँदशैली घाटात पोलिसांच्या श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.