नंदुरबार - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे तळीरामांच्या घशाला कोरड पडली आहे. यातून अनेक ठिकाणी चोरीछुपे मद्यविक्रीचे प्रकारही होत आहेत. नंदुरबारमध्ये मात्र, अजब प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतील दारुसाठा ठेवलेले गोदामच चोरट्यांनी फोडले आहे. या गोदामातून चोरट्यांनी 5 लाखांचा मद्यसाठा चोरुन नेला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामातून मद्याची चोरी! - गोदाम
नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतील दारुसाठा ठेवलेले गोदाम चोरट्यांनी फोडले आहे. या गोदामातून चोरट्यांनी 5 लाखांचा मद्यसाठा चोरुन नेला.
नंदुरबार शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या जवळ असलेल्या दूध डेअरीच्या कम्पाऊंडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्याचे गोदाम आहे. चोरट्यांनी या गोदामाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे तोडून आत प्रवेश केला. 5 लाख 13 हजार 440 रुपये किमतीचा मद्यसाठा त्यांनी चोरुन नेला.
याबाबत दुय्यम निरीक्षक सुभाष किसन बाविस्कर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुध्द कलम 380, 454, 457, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करत आहेत.