नंदुरबार- धडगाव तालुक्यातील चांदसेली घाटात दरड कोसळल्याने एका महिलेला उपचारासाठी नेता आले नाही, त्यामुळे तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. सिदलीबाई पाडवी असे त्या मृत महिलेचे नाव आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सिदलीबाई पाडवी यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी एखाद्या वाहनाची देखील सोय उपलब्ध करता आली नाही. त्यांचे पती त्यांना खांद्यावरून उपचारासाठी घेऊन जात होते. मात्र त्यातही दरड कोसळल्याने उपचाराअभावी त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा सातपुड्यातील आदिवासींचं दुर्दैव आणि दुःख समोर आलं आहे. या चांदसैली घाटात दरवर्षी दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद पडते आणि हजारो आदिवासी बांधवांचा जीवन वेठीस धरले जाते. त्यामुळे लोकसंघर्ष मोर्चा तर्फे प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरडीखाली नव्हे तर आजाराने महिलेचा मृत्यू- जिल्हा प्रशासनाची माहिती
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे तळोदा-धडगाव रस्त्यावरील चांदसेली घाटात रस्त्यांवर दरड कोसळली होती. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक पूर्णत:बंद झाली होती. त्याचवेळी पिपळाकुवा येथील महिला सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती त्यांना उपचाराठी चांदसेली हून तलोळ्यादाला घेऊन येण्यासाठी निघाले. मात्र दरड कोसळल्याने वाहन जाण्यास रस्ता नव्हता. इकडे पत्नीची तब्येत खालावल्याने पाडवी यांनी पत्नीला खांद्यावरून तळोद्याला न्यायचा निर्णय घेतला. मात्र सिदलीबाई यांनी रस्त्यातच जीव सोडला आणि दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पाडवी यांनी केलेल्या धडपडीला अपयश आले.
दरड कोसळून नाही आजारी असल्याने मृत्यू-
तळोदा मार्गावर कोसळलेल्या दरडीत रुग्णवाहिका अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची एक बातमी सिदलीबाई पाडवी यांच्या मृत्यूनंतर तालुक्यात पसरली होती. मात्र पिपलाकुवा येथील महिला सिदलीबाई पाडवी यांचा मृत्यू दरडीखाली नव्हे तर त्यांचा्या आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. त्या दरडीखाली सापडल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मात्र दरड कोसळल्यामुळे त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही, याला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सिदलीबाई यांना तिच्या कुटुंबीयांनी बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील अधीपरिचारिकेने रुग्णास तपासले असता, ती महिला शुध्दीवर नव्हती आणि रक्तदाब आणि पल्स जाणवत नव्हते. महिलेचे संपूर्ण शरीर थंड पडून कडक झाले होते. त्यावरून रुग्णालयात येण्यापूर्वीच महिला मृत झाल्याची खात्री अधीपरिचारिकेने केली. तसेच त्याबाबत तिने सिदलीबाई यांचा मृत्यू झाल्याचेही सोबतच्या व्यक्तीला सांगितले. रुग्णास मृत अवस्थेत आणल्याने पोलिसांना कळवुन पुढील कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी केसपेपर काढावा, अशी सुचना अधिपरिचारिकांनी केली. त्यावर ती व्यक्ती सदर महिलेस मोटरसायकलीवर घेऊन गेली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्याला देखील कळविले होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.