नंदुरबार- कोणत्याही गोष्टीचे योग्य नियोजन केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. पाण्याचे योग्य नियोजन नसेल तर त्याचा फटका कसा बसतो हे, यंदाच्या दुष्काळात अनुभवायला मिळत आहे. शहादा तालुक्यातील खेड गावचे शेतकरी मनीष पाटील यांनी दुष्काळातही पाण्याचे योग्य नियोजन करून 15 एकरवर केळी पिकाचे उत्पादन घेऊन विदेशात निर्यात करण्याचा बहुमान मिळवला आहे.
दुष्काळी परिस्थितीही पाण्याचे योग्य नियोजन करून केळीचे पीक निर्यात महाराष्ट्रातील मध्यप्रदेश सीमेवर वसलेल्या शहादा तालुक्यातील खेड, बामन, पुरी या गावातील शेतकरी उत्तम दर्जाच्या केळी पिकविण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीतही हा दर्जा कायम ठेवला आहे. शहादा तालुक्यातील खेडे गावचे शेतकरी मनीष पाटील यांनी 15 एकरमध्ये जैन टिशू कल्चरवर आधारित केळीचे रोप लावले आहेत. आणि पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळातही यशस्वी केळीची बाग फुलवली आहे.
मनीष पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीतही केळीच्या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले. आणि शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जैन टिश्यू कल्चरवर आधारित एक एकरमध्ये पंधराशे केळीचे रोप लावून ठिबक सिंचन द्वारे पाण्याचे नियोजन केले आहे. यंदा दुष्काळात पाण्याची पातळी खालावली आहे. पण ठिबकद्वारे केळी पिकाला पाण्याचे नियोजन केल्यामुळे मी यशस्वी केळीचे उत्पादन घेऊ शकलो, असे मनीष पाटील यांनी सांगितले. मनीष पाटील यांना एका झाडाला सरासरी 100 रुपये खर्च आला आहे. त्यांना एका झाडावर 25 किलो वजनाच्या गडाचे उत्पादन मिळत आहे. केळीचे पीक उत्तम दर्जाचे असल्याने बाजार भाव प्रमाणे त्यांना चांगला भाव मिळाला आहे.
मनीष पाटील यांच्या शेतात व्यापाऱ्यांनी येऊन तोडणी सुरू केली आहे. तोडणी केल्यानंतर लगेचच निर्यात करण्यासाठी योग्य पद्धतीने बॉक्समध्ये पॅकेजिंग करून निर्यातीसाठी रवाना केली जात आहे. या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही पाण्याचे योग्य नियोजन केले आणि केळीच्या पिकाचे यशस्वी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.