नंदुरबार- जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व मजूर शिक्षणासाठी तसेच कामासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या विविध ठिकाणी गेले होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी सुरु झाली. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे येथील विद्यार्थी व मजुरांनी पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये अडकलेल्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना नंदुरबारमध्ये परतण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.
नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परजिल्ह्यात जात असतात त्याचप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर देखील मोठ्या प्रमाणावर घराबाहेर जात असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व मजूर अडकून होते. अशा परिस्थितीत विद्यार्थी व मजुरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. अशावेळी त्यांनी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी विद्यार्थी व मजुरांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना घरी परत आणण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविल्या.