नांदेड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानंतर या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये त्रुट्या आढळून आल्याचे समोर आले आहे. नियम धाब्यावर बसवून शासनाला गंडविल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या सर्व प्रकरणात जि.प.च्या दोन अधिकाऱ्यांची तब्बल ६ तास चौकशी झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम राचुरे याला गुन्हे शाखेच्या पथकाने लातूरमध्ये जेरबंद केले.
लोक शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूरचे अध्यक्ष विश्वास राचूरे, सचिव विक्रम राचुरे व इतर कार्यकारी मंडळ कायदेशीर रित्या अस्तित्वात नसताना यातील आरोपींनी संगनमत करून प्राथमिक शाळा बिजूर, सत्यसाईबाबा प्राथमिक विद्यालय बिलोली, अशोक प्रा.वि. कुंडलवाडी, त्रिशला देवी प्रा.वि.दत्तनगर, नांदेड या शाळा जून २०१२ ते मार्च २०१५ दरम्यान कायदेशीर अस्तित्वात नसताना त्या असल्याचे दाखविले. बनावट कागदपत्रे तयार करून शासनाला १ कोटी ४४ लाख रूपयांना गंडविले. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित संस्थेने शासनाला दाखल केलेले बनावट प्रस्ताव जप्त केले असून अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणी संबंधित संस्थाचालक कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये जि.प.सदस्या अनुराधा अनिल पाटील व साहेबराव धनगे यांनी केली होती. त्यानंतरही शिक्षण विभागाने संस्थेवर कारवाई केली नव्हती. अखेर जि.प.शिक्षण विभागाने संस्थाचालक व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र सरकार सुविधा देत नसेल तर टीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढवू
या प्रकरणात न्यायालयाने जामीन नामंजुर केल्यानंतर यातील आरोपींचे धाबे दणाणले होते. यातील मुख्य आरोपी विक्रम लक्ष्मण राचुरे याला शुक्रवारी लातूर येथून शिक्षण उपसंचालक कार्यालयात अटक करण्यात आली. त्याला बिलोलीच्या न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरु केल्यानंतर याची पाळेमुळे जि.प.च्या शिक्षण विभागात असल्याचे निष्पन्न झाले. याकरता आता आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या तपासाची सुत्रे जि.प.कार्यालयाकडे वळविल्यामुळे येथील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यातील काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून त्यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. तर काही जणांना सोमवारी २३ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आले आहे. या प्रकरणात १ कोटी ४४ लाख १८ हजार ८८४ रुपयांचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आर्थिक गुन्हे शाखेने वर्तविला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.के.केंद्रे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम राचुरे यास अटक करण्यात आली असून या प्रकरणात तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांच्यासह विश्वास लक्ष्मण राचुरे, बजरंग रामलू पाडगे, संदीप पुंडलिकराव गायकवाड, सुनील सूर्यकांत गुबनर, दत्ता राजगोरे व वेतन पथकाचे तत्कालीन अधीक्षक एन.एस.राठोड यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी पसार आहेत.