नांदेड :देविदास सीबिया याची पत्नी रेखा आणि तीन मुले मागच्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत राहत नाहीत, त्यामुळे तो तणावात आहे. त्यामुळे सदर तरुणाने आपली बायको आणि मुलांना बोलावण्यासाठी शहरातील शोभानगर येथे असलेल्या चक्क पाण्याच्या टाकीवर चढून सकाळी १० वाजताच्या सुमारास शोले स्टाईल आंदोलन केले. बायको व मुलांना बोलवा अन्यथा, टाकीवरून खाली उडी मारतो, असा धमकीवजा इशारा त्याने दिला.
विमानतळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल :देविदास त्याची पत्नी आणि दोन मुलांसह हैद्राबादमध्ये कामास होता. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला. मात्र, कौटुंबिक वादातून पत्नी मुलांसह सासरवाडी हैद्राबादमध्येच राहत होती. पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेत, सदर तरुणास खाली येण्यासाठी विनंती केली. मात्र, जोपर्यंत बायको आणि मुलं घरी येणार नाहीत, तोपर्यंत आपण खाली येणार नाही, असा निश्चय त्याने केला.