नांदेड - गोदावरी नदी पात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा तब्बल २४ तासानंतरही शोध लागला नाही. मच्छिमार, पोलीस कर्मचारी सोळा तासापासून शोध मोहीम राबवित असले तरी युवकाचा थांगपत्ता लागला नाही. धुळवडीच्या दिवशी सकाळी १० वाजताच्या दरम्यान मारोती पांडे इज्जतगावकर (वय-३५) या तरुणाने आमदुरा ता. मुदखेड येथील गोदावरी नदीच्या पुलावरून नदी पात्रात उडी मारली होती.
गोदावरी नदी पात्रात तरुणाची उडी.. २४ तासानंतरही शोध लागेना! - तरुणाची गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या
तरुणाची गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात आमदुरा (ता. मुदखेड) येथे घडली. या घटनेला २४ तास उलटूनही अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
आपला मुलगा नदीत उडी मारल्याचे बघताच पिता शेषराव पांडे इज्जतगावकर (वय ७१) यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. शेषराव पांडे यांनी मुलाचा पाण्यात शोध घेतला. मात्र मारोती पांडेचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाल्लेवाड कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.
कालपासून पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाचा शोध सुरू असून आज सायंकाळपर्यंत तरुणाचा शोध घेण्यात आला. मुदखेड पोलीस आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, महानगरपालिका नांदेडचे जीवरक्षक गेल्या २४ तासापासून प्रयत्न करूनही पाण्यात उडी घेतलेल्या तरुणचा शोध लागला नाही. अंधार पडत असल्यामुळे आज दिनांक ११ रोजीची शोध मोहीम थांबविण्यात आली असून उद्या पुन्हा सदरील युवकाचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.