नांदेड- नगीनाघाट येथे गणेश विसर्जनावेळी सेल्फी काढताना तिघे जण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रशासनाने नदी परिसरात शोधमोहीम सुरु केली. या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांची शोधमोहीम सुरू आहे.
गोदावरी नदीपात्रात सेल्फी काढताना तिघे गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला - नगीनाघाट
गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेले तिघे जण वाहून गेल्याची घटना घडली होती. या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांची शोधमोहीम सुरू आहे.
नांदेड शहरातील बहुतांश गणेश मंडळाचे विसर्जन शहरा नजीकच्या बंदाघाट तसेच नगीनाघाट येथे केले जाते. गुरुवारी सायंकाळी या घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी अरविंद निषाद (वय १९), रामनिवास निषाद (वय २०) आणि धर्मेंद्र धरमंडरा (वय १७) हे तिघे नगीनाघाट येथे गेले होते. गोदावरी नदीपात्रात विष्णुपूरीतून पाणी सोडल्याने नदी प्रवाहित झाली होती. नदीपात्रात उतरताच पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने हे तीनही तरूण नदीत वाहून गेले. हे तीनही युवक उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील आहे. ते जून महिन्यात बांधकाम मजूर कामावर शहरात आले होते. गोदावरी जीवरक्षक जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशामन दल आणि पोलिसांच्या वतीने या तीन तरुणांचा शोध घेतला जात आहे. या तिघांपैकी धर्मेंद्र रमेश निषाद याचा मृतदेह शुक्रवारी सापडला असून इतरांची शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी नंदी नगीना निशाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.