नांदेड- मागील काही आठवड्यांपासून जिल्ह्यात थंडीची लाट उसळली आहे. त्यामुळे त्याचा केळीच्या बागांना मोठा फटका बसला आहे. थंडीमुळे केळीच्या पिकाची उंची खुंटली असून, पाने पिवळी पडून करपली आहेत.
डिसेंबरपासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ग्रामीण भागात हुडहुडी भरायला सुरूच आहे. मागील दोन दिवसांपासून अधिकच पारा घसरल्याने हुडहुडी वाढली होती. यावर्षी जिल्ह्यातील तापमान ७ अंशापर्यंत घसरले आहे. या वर्षात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, थंडीच्या प्रमाणात घट होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीसापासून थंडीची चाहूल लागली होती. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण अधिकच वाढले होते.
गहू, ज्वारी, हरभऱ्यासाठी थंडी पोषक ठरते. पण या थंडीत धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे तर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केळीच्या झाडाची वाढ खुंटत आहे. पाने पिवळी पडत आहेत. जून व जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीच्या बागांना थंडीचा फटका बसत आहे.
गेल्यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे धरणात पाणी साठले नव्हते. केळीच्या बागांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात केळी कापून टाकली होती. गतवर्षी शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेऊन केळी जोपासली होती. विकत पाणी घेऊन केळीच्या बागांना देण्यात आले होते. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप पैसा खर्च केला होता. मात्र, केळीला भाव मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला होता. थोडे फार पैसे मिळू लागले होते तर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळीची बाग नष्ट झाली होती. अनेक संकटाच्या बाहेर निघून शेतकऱ्यांनी जून व जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीच्या पिकाची वाढ खुंटली असल्याचे दिसून येत आहे. तसेच केळीची पाने करपली आहेत. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी श्रीकांत देशमुख, वसंत देशमुख, सुदर्शन देशमुख, प्रसाद हापगुंडे यांनी केली.