महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील तब्बल ८२ गावांना पाणीटंचाईच्या झळा

नांदेड शहरासह ग्रामीण भागालाही यंदा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ८२ गावे आणि ७८ वाड्या-तांड्यांच्या पिण्याच्या पाण्याची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. यासाठी ९ शासकीय आणि ११० खासगी अशा ११९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील तब्बल ८२ गावांना पाणीटंचाईच्या झळा

By

Published : Jun 14, 2019, 10:36 AM IST

Updated : Jun 14, 2019, 12:21 PM IST

नांदेड- शहरासह ग्रामीण भागालाही यंदा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ८२ गावे आणि ७८ वाड्या-तांड्यांच्या पिण्याच्या पाण्याची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. यासाठी ९ शासकीय आणि ११० खासगी अशा ११९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील तब्बल ८२ गावांना पाणीटंचाईच्या झळा

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ८३ टक्के पर्जन्यमान झाले आहे. त्यातच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने टंचाईच्या झळा वाढल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत टंचाईची सर्वाधिक झळ मुखेड तालुक्याला सोसावी लागत आहे. तालुक्यातील ३३ गावे आणि ६३ वाड्या-तांड्यांना ५ शासकीय आणि ४८ खाजगी अशा ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नांदेड तालुक्यातील ग्रामीण भागात ३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. तर देगलूर तालुक्यात २ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची तहान भागविली जात आहे.

या बरोबरच किनवट, कंधार आणि हदगाव तालुक्यांसाठीही टँकर सुरू करावा लागण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या टँकरसाठीचे ९४ प्रस्ताव जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, पाणी टंचाई निवारणार्थ १ हजार १८० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड तालुक्यात ४२, अर्धापूर २९, मुदखेड ३२, भोकर ८८, उमरी १५, हदगाव ९८, हिमायतनगर ५६, बिलोली ८८, नायगाव ६८, देगलूर ६०, मुखेड २०७, कंधार ६७, लोहा १५३, किनवट ११० तर माहूर तालुक्यात ६७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

विहीर अधिग्रहणाची प्रस्तावित संख्या १ हजार ८२४ इतकी असून पंचायत समितीस्तरावर १ हजार ३१५ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. तर तहसीलदार यांच्याकडे १ हजार ३०४ प्रस्ताव सादर असून ७५० विंधन विहिरींच्या अधिग्रहणाचे आदेश तहसीलदारमार्फत जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, मान्सून लांबणीवर पडल्याने पाणी टंचाईची तीव्रता ग्रामीण भागातही वाढण्याची चिन्हे आहेत. या दृष्टीने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे, असे असले तरी ग्रामस्थात संताप आहे.

Last Updated : Jun 14, 2019, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details