महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडकरांना दुष्काळाचे चटके; आजपासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा..!

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे चटके बसायला सुरू झाले आहेत. विष्णुपुरी जलाशयात केवळ साडेनऊ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याने शहरवासीयांना गुरुवारपासून म्हणजेच आज २५ तारखेपासून तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे.

दुष्काळ

By

Published : Apr 25, 2019, 12:07 PM IST

नांदेड- जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे चटके बसायला सुरू झाले आहेत. विष्णुपुरी जलाशयात केवळ साडेनऊ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याने शहरवासीयांना गुरुवारपासून म्हणजेच आज २५ तारखेपासून तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे. दर चौथ्या दिवशी नळाला पाणी येणार असल्यामुळे महिन्याभरात आता ११ दिवसांऐवजी ७ दिवस पाणी पुरवठा होणार आहे.

नांदेड महापालिका

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरातील ५० ते ६० टक्के बोअरवेल्स आटले आहेत. महापालिकेने हातपंप दुरूस्त केले असले तरी त्यातील बऱयाच हातपंपाना पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. भुगर्भातील पाणी पातळी खालावल्याने पंप देखील निकामी ठरत आहे. अशा परिस्थितीत सध्या ९ टँकरने पाणी पुरवठा करणाऱया महापालिकेने आणखी १० टँकर आणण्याची तयारी केली असून हे टँकर खासगी पुरवठादाराकडून मागविले जाणार आहेत.

इसापूर धरणातून येत्या दोन दिवसात तिसऱयांदा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सांगवी येथे उभारण्यात आलेल्या उद्भव पाणी पुरवठा योजनेच्या बंधाऱयात एक दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. हे पाणी नांदेड उत्तर भागास किमान २० दिवस पुरेल आणि दक्षिण भागासाठी विष्णुपुरी जलाशयातील पाणी उचलून शहरवासियांची तहान भागविण्यात येणार आहे. विष्णुपुरी जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा २५ मे पर्यंतच पुरणार असल्यामुळे त्यानंतर मृतसाठ्यातून पाणी उचलण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांऐवजी तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण आणण्यासाठी अद्याप कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत. बांधकामावर पाणी वापरण्यास बंदी आणली नाही. तोट्या नसलेल्या नळ जोडणी बंद केल्या नाहीत. रस्त्यावर सडा टाकणे, गाड्या धुणे यासह अन्य प्रकार शहरात सुरूच आहेत. उपाययोजना करण्याऐवजी कठोर निर्णय घेण्यासाठीच महापालिकेची यंत्रणा आहे की काय, असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details