नांदेड - मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना नाव नोंदविता यावे, यासाठी २३ आणि २४ फेब्रुवारीला नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेडमध्ये आजपासून मतदार नोंदणी; सर्व मतदान केंद्रांवर चालणार मोहीम - voter
ज्या पात्र मतदरांची नोंदणी काही कारणांनी झाली नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.
या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज सादर करण्याची आवश्यकता आहे. मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरूस्तीसाठी नमुना ८ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिद्ध अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून आपले नाव नोंदवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास या मोहीम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.